पुणे – मागील पंधरा दिवसांपासून विश्रांती घेतलेला मान्सून राज्यात पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील चार ते पाच दिवस विदर्भ आणि मराठवड्यात मेघगर्जेसह पावसाची शक्यता असून, याठिकाणी हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. दरम्यान, पुणे शहरातही आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि हलक्या सरी पडल्या. दिवसभरात शहरात 1 मिमी पावसाची नोंद झाली.
नैऋत्य मोसमी पाऊस हिमालयाच्या पायथ्याशी आहे. पुढील 24 तासांत मान्सून दक्षिणेकडे सरकरण्याची शक्यता आहे. तर वायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या भागात एक चक्रीय स्थिती निर्माण झाली असून, त्याच्याच प्रभावाखाली या भागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असल्याने मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली.
राज्यात पुढील दोन ते तीन दिवस कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर विदर्भ आणि मराठवाड्यात विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यात हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुणे शहरातही विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात होईल. दिवसभर ढगाळ वातावरण तर अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. घाटमाथ्यावरही पावसाचा जोर पुन्हा वाढणार आहे.