भोपाळ –भाजपने मध्यप्रदेशात नेतृत्वबदल करताना ५८ वर्षीय नेते मोहन यादव यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घातली. त्यामुळे त्या राज्याची धुरा प्रदीर्घ काळ सांभाळणारे मावळते मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे राज पक्षाने सत्ता राखूनही संपुष्टात आले.
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत दमदार विजय मिळवून भाजपने त्या राज्याची सत्ता राखली.
त्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार देण्याचे त्या पक्षाने टाळले. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाची शर्यत भाजपने खुली ठेवल्याचे स्पष्ट झाले. त्यातून शिवराज यांच्या जागी नवा चेहरा दिला जाऊ शकतो, असा संदेशही दिला गेला. साहजिकच, मुख्यमंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार याविषयी मोठा सस्पेन्स निर्माण झाला. तो सोमवारी भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीमुळे संपला. त्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते आणि अर्थातच नवे मुख्यमंत्री म्हणून यादव यांची निवड करण्यात आली.
यादव यांची निवड अनपेक्षित आणि चकित करणारी ठरली. शिवराज यांच्या जागी नवा चेहरा देण्याचे ठरल्यास संभाव्य मुख्यमंत्री म्हणून काही नावे चर्चेत होती. त्यामध्ये यादव यांच्या नावाचा समावेश नव्हता. मात्र, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असणारी जवळीक आणि इतर मागासवर्गातील (ओबीसी) नेता असल्याने यादव यांचे पारडे जड ठरल्याचे मानले जाते. यादव तिसऱ्यांदा आमदार बनले आहेत. मध्यप्रदेश विधानसभेत ते उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. मागील राज्य मंत्रिमंडळात त्यांनी उच्च शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली.
यादव यांच्या रूपाने भाजपने मध्यप्रदेशात पुन्हा ओबीसी नेत्याकडे धुरा सोपवली आहे. मुख्यमंत्रिपद भुषवणारे ते सलग चौथे ओबीसी नेते ठरले आहेत. सर्वप्रथम २००३ मध्ये फायरब्रँड नेत्या उमा भारती यांना ती संधी मिळाली. त्यानंतर भाजपने बाबूलाल गौड आणि शिवराज या ओबीसी नेत्यांना मुख्यमंत्री बनवले. मध्यप्रदेशच्या लोकसंख्येत ओबीसींचे प्रमाण सुमारे ४८ टक्के इतके आहे.