मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते म्हणजे ‘अमरीश पुरी’. अमरीश पूरी यांचा ‘मि. इंडिया’ या चित्रपटातील ‘मोगॅम्बो खुश हुवा..’ हा संवाद वर्षांनुवर्ष लोकांच्या मनात गारुड करून आहे. भेदक डोळे, कपाळावर आठ्या, बोलण्यात जरब असे खलनायक म्हणजे अमरीश पुरी.
अमरीश पुरी आपल्या अभिनयातून प्रेक्षकांमध्ये चीड आणि संताप निर्माण करायचे. वकील, स्मगलर, राजकीय नेता तसेच चरित्र अभिनेता म्हणूनही त्यांनी भूमिका छान वठविल्या तरी ते खलनायक म्हणूनच रसिकांना भावले. आणि याच अष्टपैलू अभिनेत्याचा आता बायोपिक येणार असल्याचं समोर आलं आहे.
रुपेरी पडद्यावरचा खलनायक खऱ्या आयुष्यात कसा होता हे प्रेक्षकांना या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. अमरीश पुरी हा एक खलनायकी ब्रँड झाले होते. आणि हाच ब्रँड आता प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमरीश पुरी यांचा नातू म्हणजेच ‘वर्धन पुरी’ याला त्याच्या आजोबांच्या आयुष्यावर सिनेमा बनवायचा आहे.
त्यामुळे या बायोपिकच्या कामाला लवकरच सुरुवात होऊ शकते. अमरीश पुरी यांची भूमिका कोण साकारणार हे अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, त्यांचा जीवनपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभता येणार आहे. अमरीश पुरी यांनी 1967 ते 2005 पर्यंत बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत काम केलं आहे.
भारदस्त आवाजामुळे त्यांनी या सिनेमांत खलनायकाची भूमिका साकारली आहे. बॉलिवुड सोडा हॉलिवुडलाही अमरीश पुरींचं आकर्षण होतं. हॉलिवुडला मुंबईत आणलं ते अमरीश पुरी यांनीच. हॉलिवुडचे महान दिग्दर्शक स्टिव्हन स्पिलबर्ग यांना ‘इण्डियाना जोंस अँड द टेम्पल ऑफ डूम’ या सिनेमात अमरीश पुरी यांना घ्यायचं होतं. त्यामुळे स्क्रीनटेस्टसाठी अमेरिकेला या असं बोलावणं आलं. मात्र अमरीश पुरी यांनी अमेरिकेत जायला नकार दिला.