पिंपरी – राज्यातल्या सार्वजनिक रुग्णालयात लागणाऱ्या आगीच्या घटना टाळण्यासाठी आणि वित्त व जीवितहानी रोखण्यासाठी सर्व रुग्णालयात दर तीन महिन्यांनी मॉकड्रिल घेण्याचे आदेश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच जारी केले आहेत. यानुसार महापालिकेच्या रूग्णालयांमध्येही अग्निशमन विभाग आणि वैद्यकीय विभाग वेळोवेळी मॉकड्रिल घेणार असल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख किरण गावडे यांनी सांगितले.
भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर रुग्णालयातील फायर ऑडिटसाठी सरकारने एक समिती स्थापन केली होती. तसेच मागील वर्षी शासकीय व खासगी रूग्णालयात आगीच्या घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने खबरदारी म्हणून काही उपाय योजना करणे गरजेचे आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची शहरात यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालय, जिजामाता रूग्णालय, तालेरा, आकुर्डी आणि भोसरी यासह थेरगाव, सांगवी, यमुनानगर, संभाजीनगर, बोपखेल, किवळे
पिंपळे गुरव, फुगेवाडी या ठिकाणी रूग्णालये आहेत. या रूग्णालयात दररोज शेकडो रूग्ण उपचार घेत आहेत. राज्यात काही रूग्णालयात घडलेल्या आगींच्या घटनांनंतर फायर ऑडिटचा मुद्दा समोर आला होता. त्यामुळे महापालिका रूग्णालयातील अग्निशमन यंत्रणा कशाप्रकारे सुरू आहे, याची वेळोवेळी पडताळणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी काही महिन्यांनी मॉकड्रिल होणे गरजेचे आहे.
सार्वजनिक रुग्णालयात दर तीन महिन्यांनी मॉकड्रिल घेण्याचे आदेश राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकतेच जारी केले आहेत. हे आदेश महापालिका रूग्णालयांना लागू होत नसले तरी या आदेशाची आपण अंमलबजावणी करणार आहोत. महापालिकेच्या महत्वाच्या पाच रूग्णालयांत अग्निशमनचे जवान सदैव तैनात असतात. त्यांना आठवड्यातून एकदा ट्रेनिंगही देण्यात येते.
– किरण गावडे, प्रमुख, अग्निशमन विभाग