पुणे- चालकाला लाथाबुक्यांनी मारहाण करून टॉवेलने तोंड बांधून ट्रक पळवून नेत दारूच्या बाटल्या, मालाचे इनव्हाईस बिल व दोन मोबाइल आणि रोख रक्कम असा पंचावन्न लाख, तेहतीस हजार रूपयांचा माल जबरीने चोरून नेल्याप्रकरणात मोक्का न्यायाधीश ए. एन. शिरसीकर यांनी जामीन मंजुर केला.
दत्तात्रय काळूराम गायकवाड (वय 50) असे त्याचे नाव आहे. या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत चुकीची कारवाई करण्यात आली. मोक्का लागू होत नही. यापूर्वीच सह आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. गायकवाड याला जरी ओळख परेडमध्ये फिर्यादींनी ओळखले. तरीही तो खटला चालेल, त्यावेळी त्याचे महत्त्व ठरणार आहे. तपास पूर्ण झाला आहे. दोषारोपपत्र दाखल झाले आहे. आरोपीला कारागृहात ठेवून काही निष्पन्न होणार नाही. त्यामुळे जामीन देण्याची मागणी ऍड. मिलिंद पवार यांनी केली. ऍड. पवार यांना ऍड. विश्वास खराबे आणि ऍड. विपुल आंधे यांनी मदत केली.
याबाबत चालक मुकेश अशोककुमार गुप्ता (वय-33 रा-मूळ. बिहार सध्या रा-भिवंडी ) याने सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. खळद गावच्या हद्दीत ही घटना घडली. पुणे गोटेमळा येथील पिकअप बस थांबाच्या ठिकाणी दोन अज्ञात मोटार सायकलस्वारांनी ट्रक थांबवून लुटमार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी गायकवाड याला अटक केली आहे.