मोबाइल ग्राहकांमधून नाराजीचा सूर!

कात्रज परिसरात आयडिया, व्होडाफोनचे नेटवर्क डाऊन

कात्रज – कात्रज गावठाण, भारती विद्यापीठ, सुखसागरनगर, गोकुळनगर, कात्रज -कोंढवा रोड, शिव -शंभोनगर या परिसरात गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आयडिया आणि व्होडाफोन या नामांकित कंपन्यांचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांमधून नाराजीचा सूर आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ग्राहकांना नेटवर्कची समस्या भेडसावत आहे.

सर्वांची दैनंदिन गरज असलेल्या आणि रोजच्या वापरात असलेल्या मोबाइलला काय झाले या काळजीने ग्राहक त्रस्त झाले आहेत. ही समस्या नामांकित कंपन्यांनी लवकरात लवकर मार्गी लावावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
विशेष म्हणजे फोन चालू असताना देखील व्यस्त किंवा नेटवर्कच्या बाहेर आहे, असे सांगते आणि आवाज पण नीट येत नाही. ग्राहक प्रतिनिधीशी संपर्क साधला असता ते सांगतात 3 जी सीम कार्ड असेल तर 4 जी करा आणि मोबाइल अपडेट्‌स करा आणि तरी देखील ही समस्या जाणवत आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

ग्राहक प्रतिनिधीला फोन केला असता मोबाइल बंद करा आणि नंतर होईल सुरु अशी उत्तरे येतात; पण मुळात काही तांत्रिक अडचणी आहेत का ते सांगत नाहीत.
– वैशाली टेकाळे, विद्यार्थिनी


आयडिया कंपनीचे नेटवर्क खूप चांगले होते; पण गेल्या दोन-तीन महिन्यांत त्याची सेवा पूर्णपणे ढासळली असून ऐन महत्त्वाच्या कामाच्या वेळी फोन लागत नाहीत .यावर तत्काळ या कंपन्यांनी मार्ग काढणे गरजेचे आहे.
– कैलास सुतार, नागरिक

Leave A Reply

Your email address will not be published.