पुणे- महापालिकेच्या आगामी निवडणुकीत पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असलेल्या चर्चेला मनसेने तूर्तास विराम दिला आहे. याबाबत पक्षाने अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे शहर पदाधिकाऱ्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य करू नये, असे आदेशच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान, निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि.1) ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलवली आहे. भाजपसोबत युतीबाबत यावेळी चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यात पुढील वर्षी महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेच्या युतीची अटकळ बांधली जात आहे. दरम्यान, पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा झाल्याने पुण्यातही ही युती होण्याची चर्चा होती. दुसऱ्या बाजूला राज्य शासनाने तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला आहे, तर 2017 मध्ये मनसेला चारच्या प्रभाग रचनेत सर्वाधिक फटका बसला असून, यात पक्षाच्या नगरसेवकांची संख्या 28 वरून थेट 2 वर आली आहे.
बहुसदस्य प्रभागात मनसेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सांगत युतीबाबत पक्षात दोन प्रवाह आहेत. दरम्यान, पक्षाची भूमिका ठरत असताना मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजप सोबत युती करण्याबाबत आग्रही भूमिका मांडली होती. त्याचे पडसाद कार्यकर्त्यांमध्ये उमटू लागल्याने याप्रकरणी मनसे अध्यक्षांनीच लक्ष घातले आहे.
राज ठाकरे 3 महिन्यांत दहाव्यांदा पुणे भेटीवर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवार आणि शनिवारी दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. मागील तीन महिन्यांत हा त्यांचा सुमारे दहावा दौरा असून, त्यांनी निवडणुकांच्या तोंडावर संघटनात्मक बांधणीला भर दिल्याचे चित्र आहे. या दौऱ्यात ते मनसेचे सर्व शाखाध्यक्ष, शहर सचिव, शहर संघटकांशी शुक्रवारी चर्चा करणार आहेत. त्यानंतर शनिवारी विभाग अध्यक्ष व उपशहराध्यक्षांच्या नियुक्त्या करणार असून, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. याशिवाय, शनिवारी ते मनसेच्या 19 माजी नगरसेवकांशी चर्चा करणार असल्याचे पक्षाचे नेते बाबू वागसकर यांनी सांगितले.