पुणे – शहर परिसरात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामध्ये घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार, तर शहरात हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
शहरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हलका ते मध्यम पाऊस होत आहे. बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शिवाजीनगर येथील वेधशाळेत 2 मिमी आणि लोहगावमध्ये 2.6 मिमी पावसाची नोंद घेण्यात आली आहे, तर हवामान विभागाने घाटमाथा परिसरासाठी पावसाचा “यलो अलर्ट’ दिला आहे.
दरम्यान, “गुलाब’ चक्रीवादळाची प्रणाली गुजरातकडे सरकून गेल्याने राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, गुलाब चक्रीवादळाचे कमी दाबाच्या क्षेत्राचे अवशेष सध्या गुजरात येथील खंबातच्या आखातवर असून, त्यामुळे उत्तर पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे.
“गुलाब’ चक्रीवादळाच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता
अजूनही कायम आहे. त्याच्या पुढच्या प्रवासावर आमचे लक्ष आहे. अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ तयार होत आहे. वेगवेगळ्या प्रारूपांच्या आधारे अंदाज घेतला जात आहे. या चक्रीवादळास “शाहीन’ हे नाव दिले जाईल. ते पाकिस्तानकडे सरकण्याची शक्यता आहे.
– डॉ. अनुपम काश्यपी,
शास्त्रज्ञ, हवामान विभाग