मुंबई – मनसेच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आली असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात पार पडलेल्या सभेत केला. दरम्यान, मनसे नेत्यांकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते बृजभूषण सिंह यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. या फोटोमध्ये बृजभूषण आणि शरद पवार तसेच सुप्रिया सुळे एकत्र पाहायला मिळाले. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यामागे शरद पवारांचा हात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
मनसे नेते गजानन काळे आणि सचिन मोरे यांनी बृजभूषण सिंह यांचा शरद पवार आणि सुप्रिया सुळेंसोबतचा फोटो ट्विट केला आहे. तसेच, गजानन काळे यांनी ट्विटमध्ये लिहिले की, हा फोटो मावळमधील एका कार्यक्रमातील असल्याची माहिती गजानन काळे यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला शरद पवारांचा विरोध असल्याची चर्चा होत आहे.
कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है…@RajThackeray @BalaNandgaonkar @abpmajhatv @lokmat @mataonline @zee24taasnews @SandeepDadarMNS @ABPNews pic.twitter.com/Esic3lcn2Y
— Sachin Maruti More (@mnsmoresachin) May 23, 2022
बृजभूषण यांचा खुलासा
हा फोटो आल्यानंतर बृजभूषण यांनी या प्रकरणी आपले म्हणणे मांडले आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे, तर शरद पवार हे पदाधिकारी आणि संरक्षक आहेत. तीन वर्षांपूर्वीचा हा फोटो असून कुस्तीच्या क्षेत्रात माझ्यामुळे चांगले काम झाल्याची पवार यांची भावना असल्याचे त्यांनी नमूद केले. पवार यांच्याशी चांगले संबंध असल्याचा आपल्याला अभिमान असून ते अयोध्येत आले तर आपण त्यांना प्रणाम करू असेही त्यांनी म्हटले आहे.