भोर-भोर- वेल्हे, मुळशी विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम थोपटे यांनी सर्वांगिण विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. तीन तालुक्यांतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी समन्वय साधत तळागाळातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावली आहेत. आमदार थोपटे यांच्या विकासकामांचा धडाका जिल्ह्यात आदर्शवत ठरला आहे.
भोर तालुक्यातील उत्रौली-वडगावमध्ये तसेच भोरेश्वर औद्योगिक वसाहतीच्या जागेवर “एमआयडीसी’ उभारण्यासाठी संग्राम थोपटे यांनी विधानसभेत आवाज उठविला आहे. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री, शेतकऱ्यांबरोबर बैठका घेतल्या आहेत. लवकरच दोन्ही कामांना वेग येणार आहे. भरे (ता. मुळशी) येथे क्रीडा संकुल मंजूर झाले असून, एक कोटी रूपयांचा निधीही यासाठी मंजूर केला आहे.
या संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. भोलावडे (ता. भोर) व निगडे बुद्रुक (वेल्हे) येथील क्रीडा संकुलासाठी जागा संपादनासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच ते काम मार्गी लागणार आहे. वांगणी, वाजेघर व शिवगंगा खोऱ्यात उपसा सिंचनाच्या योजना मंजूर केल्या आहेत.
अतिवृष्टीने धोकादायक झालेल्या कोंढरी गावाच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न केले आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत 103 कोटींचा निधी रस्त्यांसाठी खर्च केला आहे. विशेष रस्ते दुरूस्तीसाठी 77 कोटी, रस्ते व पुलांसाठी 72 कोटी, पीएमआरडीएअंतर्गत 13 कोटींचा निधी आणून खेड्यापाड्यातील रस्ते चकाचक केले आहेत. भोर नगरपालिकेसाठी अग्निशमन यंत्रणा आणि नवीन पाणीयोजना कार्यान्वित केल्या आहेत.
भोर शहराला पाणीपुरवठा करणारी मोटर नादुरुस्त झाली होती. तसेच अतिवृष्टीने जलवाहिनी वाहून गेली होती. त्यावर आमदार थोपटे यांनी तातडीने कार्यवाही करून नीरा-देवघर धरणाच्या उजव्या कालव्यातून शहराला पाणीपुरवठा केला आहे. त्यामुळे अतिवृष्टीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास झाला नाही.
भोर नगरपरिषद हद्दीतील एच प्रकार मालमत्ताधारकांच्या अडचणी संपुष्टात आणल्या आहेत. हिर्डोशी खोऱ्यातील 26 गावांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. त्या गावांना भेटी देऊन नुकसानग्रस्तांना आधार दिला आहे. आमदार थोपटे यांनी अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या शेती पिकांची पाहणी करीत बाधितांना धीर दिला आहे. बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला आहे. नुकसानग्रस्त शेती आणि घरांचे पंचनामे करून घेतले. त्यानंतर थोपटे यांनी शासनाकडे नुकसानीच्या रकमेसाठी पाठपुरावा केला आहे.
गुंजवणीच्या बंद जलवाहिनीच्या कामांची जलसंपदा खात्याने निविदा काढून भोर, वेल्हे व हवेली तालुक्यांतील योजनांचा उल्लेख टाळला होता. या निविदेची होळी करून आंदोलन केली आहेत. या कामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. स्थानिक नागरिकांना खेड-शिवापूर येथील टोल माफ व्हावा, यासाठी दोनवेळा आंदोलने केली आहेत.