नेवासा – नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकतर्फी झालेल्या निवडणुकीत माजीमंत्री आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार मंडळाने सर्वच्या सर्व 18 जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांना मोठी ताकत देऊनही भाजपच्या उमेदवाराचे पानिपत झाले.
बाजार समितीच्या 18 जागांसाठी आज सकाळी 8 ते दुपारी 4 यावेळात 96.16 टक्के मतदान झाले. एकूण 3 हजार 337 मतदारांपैकी 3 हजार 114 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला. आ. गडाख यांच्या नेतृत्वाखालील मंडळाची गेली अनेक वर्षे बाजार समितीमध्ये निर्विवाद सत्ता आहे. भाजपचे माजी आमदार मुरकुटे तसेच लंघे यांच्या नेतृत्वाखाली मोट बांधली. आमदार गडाख यांच्यावर नाराजी आहे. त्यांनी कामे केली नाहीत असा विरोधकांनी प्रचार करुन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला.
परंतु आमदार गडाख यांनी त्याकडे दुर्लक्ष करत मोठे मेळावे न घेता स्वतः व्यक्तिगतरित्या थेट मतदारांशी संपर्क साधला. बाजार समितीची निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम समजली गेल्याने त्यात मुरकुटे व लंघे यांना मतदारांनी साफ नाकारले असून आमदार गडाख यांच्यावरच विश्वास ठेवल्याचे दिसून आले.
बाजार समितीत आमदार गडाख गटाचे अमृत काळे, मिराबाई पांडुरंग ढोकणे, अर्जुन ऊर्फ बाळासाहेब नवले, हरिचंद्र पटारे, नंदकुमार पाटील, अरुण शिंदे, अरुण सावंत, अश्विनी भारत काळे, संगीता राजेंद्र सानप, बाबासाहेब आखाडे, सुंदराबाई सारंगधर ढवाण, बाळासाहेब दहातोंडे, नानासाहेब नवथर, सुनील धायजे, गणेश भोरे, दौलतराव देशमुख, संतोष मिसाळ हे उमेदवार विजयी झाले. हमाल मापाडी मतदारसंघात रमेश मोटे यांची बिनविरोध निवड झाली.
नेवासा भाजपमध्ये घडलंय बिघडलंय
आमदार गडाख यांनी पाणी योजना, रस्ते, सभा मंडप यासाठी कोट्यवधींचा निधी आणला असून लग्न, सांत्वन भेटी, विविध धार्मिक कार्यक्रमासाठी तालुका पिंजून काढत आहेत. याउलट केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता येऊनही मुरकुटे व लंघे यांच्यात उमेदवारीसाठी रस्सीखेच चालू असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी गडाख यांचे नेतृत्व स्वीकारल्याचे दिसून येते. भाजपची संघटना बांधणी करण्यात मुरकुटे व लंघे दोघांनाही सपशेल अपयश आल्याचे स्पष्ट झाले आहे.