मुंबई: केंद्र सरकार पाठोपाठ राज्यसरकारने देखील ३० जून पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. ठाकरे सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवणार आहे.
राज्य सरकारने चौथ्या लॉकडाउनमध्ये रेड झोन वगळता इतर ठिकाणी अनेक सेवा सुरू करण्याची परवानगी दिली होती. आता रेड झोनमध्ये येणाऱ्या महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पण कंटेन्मेंट झोनमध्ये लॉकडाउनचे कडक पालन केले जाणार असून, तेथे सध्या कोणतीही सूट देण्यात आलेली नाही.
#MissionBeginAgain in #Maharashtra –
⬇️ At a glance! pic.twitter.com/R4JzEkHhqk— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 31, 2020
3 जूनपासून हे होणार सुरू
राज्यात 3 जूनपासून उद्यानात जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच जॉगिंग, सायकल चालवणे, धावणे, शतपावली, व्यायाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र या ठिकाणी कोणतीही ग्रुप ऍक्टिव्हिटी करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच खुल्या मैदानात गर्दी करण्यासही मनाई करण्यात आली आहे.सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. तसेच प्लंबर, इलेक्ट्रेशियन, पेस्ट कंट्रोल, आणि इतर टेक्निशियनच्या कामास परवानगी देण्यात आली आहे. तसेच कंटेन्मेंट झोन वगळता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची कार्यालयांमध्ये किमान 15 टक्के हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.
5 जूनपासून हे होणार सुरू
राज्यातील सर्व मार्केट्स आणि दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5पर्यंत उघडण्यास मुभा असेल. मात्र मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स, शॉपिंग कॉम्प्लेक्सवर बंदी कायम राहणार आहे. दुकानात सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची जबाबदारी दुकानदारावर निश्चित करण्यात आली आहे. याचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास तत्काळ दुकान बंद करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच टॅक्सी, कॅब आणि रिक्षांना परवानगी असेल. मात्र, त्यासाठी 1+2 अशा संख्येचे बंधन असेल.
8 जूनपासून हे होणार सुरू
येत्या 8 जूनपासून राज्य सरकारने काही प्रमाणात खासगी कार्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. खासगी कार्यालयात केवळ 10 टक्के उपस्थिती असावी. इतर कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करावे. तसेच कार्यालयात सॅनिटायझेशन करण्यास सांगितले आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील जिल्ह्यात बससेवा सुरू राहणार आहे.