पिंपरी, दि. ११ – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री शनिवारी चिंचवड दौऱ्यावर असताना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद रविवारी (दि. ११) उमटले. पोलिसांनी शाईफेक प्रकरणी तिघांना अटक केली. तसेच पिंपरी चिंचवड पोलीस दलातील तीन अधिकारी आणि आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. चापेकर चौकात रविवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.
शनिवारी सायंकाळी मंत्री चंद्रकांत पाटील चिंचवड येथील श्रीमन महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी चिंचवड गावात आले होते. ते भाजपच्या एका कार्यकर्त्याच्या घरून कार्यक्रम स्थळी जात असताना त्यांच्यावर समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. याप्रकरणी पोलिसांनी समता सैनिक दल संघटक मनोज भास्कर घरबडे (वय ३४, रा. पिंपरी), सदस्य धनंजय भाऊसाहेब इजगज (वय २९, रा. चिंचवड), वंचित बहुजन आघाडी सचिव विजय धर्मा ओव्हाळ (वय ४०, रा. चिंचवड) या तिघांना अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, घोषणाबाजी, मानहानी, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१)/३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. ११) सकाळी चापेकर चौक चिंचवड येथे पोलिसांच्या कारवाई विरोधात आंदोलन झाले. चिंचवडसह शहरात ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. चिंचवड परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
पोलिसांवर शेकले
पालकमंत्र्यांवरील शाईफेक प्रकरण पोलिसांवर देखील शेकले आहे. या प्रकरणात शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत पोलीस निरीक्षक सतीश नांदुरकर, पोलीस उपनिरीक्षक प्रदिपसिंग सिसोदे, गणेश माने, सहाय्यक फौजदार भाऊसाहेब सरोदे, दीपक खरात, पोलीस हवालदार प्रमोद वेताळ, पोलीस नाईक देवा राऊत, सागर अवसरे, महिला पोलीस नाईक कांचन घवले, महिला पोलीस शिपाई प्रियांका गुजर यांना निलंबित करण्यात आले आहे.
मध्यम प्रतिनिधीचीही कसून चौकशी
या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा एका माध्यम प्रतिनिधीला ताब्यात घेतले. त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या प्रकरणात चौकशी सुरू असून त्यानंतर कारवाईबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल असे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सांगितले.