दहा रिक्षाचालकांची लाखोंची फसवणूक

परमिटसह नवीन रिक्षा देण्याचा बहाणा

पुणे – परमिटसह नवीन रिक्षा देण्याचा बहाणा करून एका रिक्षा विक्रेत्याने दहा रिक्षा चालकांची लाखोंची फसवणूक केली. हा विक्रेता त्याचे दुकान बंद करून 2017 पासून निघून गेला आहे. याप्रकरणी एका 65 वर्षांच्या व्यक्‍तीने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सलीम मोईनोद्दीन शेख (53, घोरपडी पेठ) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी सलीम मोईनोद्दीन शेख याचे एस. एस. इंन्टरप्रायजेस नावाने रिक्षा खरेदी विक्रीचे कार्यालय आहे. तर फिर्यादी हे रिक्षाचालक आहेत. फिर्यादीला सलीम मोईनोद्दीनने विश्‍वासात घेऊन चार रिक्षा देतो असे सांगितले. यासाठी त्यांच्याकडून 4 लाख 27 हजार रुपये वेळोवेळी उकळले. याबरोबरच इतर नऊ जणांना परमीट देतो, रिक्षा घेऊन देतो, परमीट ट्रांन्सपर करून देतो असे सांगून त्यांच्याकडूनही पैसे उकळले. हे पैसे रोखीने व चेकने घेण्यात आले आहेत. त्याने जानेवारी-2016 पासून ही रक्‍कम उकळली आहे. तर तो व्यवसाय बंद करून 2017 मध्ये निघून गेला आहे. तो परत येऊन पैसे देईल या आशेवर फिर्यादी होते. मात्र, मागील महिन्यात त्यांनी पोलीस आयुक्‍तालयात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन समर्थ पोलिसांनी केले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शेळके करत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.