पुणे – लष्करातर्फे 12 ते 14 जानेवारीदरम्यान महिलांसाठी भरती प्रक्रियेचे आयोजन केले आहे. पुण्याच्या आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ फिजीकल ट्रेनिंग (एआयपीटी) याठिकाणी भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, ओळखपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल, अशी माहिती लष्कर प्रशासनाने दिली.
महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील युवा महिलांसाठी रोजगार निर्माण व्हावा या उद्देशाने लष्करातर्फे ही भरती घेण्यात येणार आहे. या राज्यांतील इच्छुक महिला उमेदवारांनी लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळावर नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 10 वी उत्तीर्ण महिला उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. तसेच, अर्ज केल्यावर उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर ओळखपत्र पाठविण्यात येईल.
उमेदवारांनी अर्ज भरताना भरती करिता आवश्यक मुद्दे पाहून काळजीपूर्वक अर्ज भरावा, असे आवाहन केले आहे. शारीरिक परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा अशा तीन भागांत भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना बायोमेट्रिक पद्धतीने तपासून तसेच त्यांचे ओळखपत्र तपासणी करून त्यांना भरती ठिकाणी प्रवेश दिला जाईल. शारीरिक आणि वैद्यकीय चाचणीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील त्यांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सैनिकी पोलीस दलात दाखल करून घेतले जाईल.