पुणे – पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगला चित्रपटगृहसमोर मध्यरात्री घडली. हल्लेखोरांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे.
नितीन मोहन म्हस्के (वय 26) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सागर उर्फ यल्ल्या याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन आणि साथीदारांविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात एकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी नितीनचा खून केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.
नितीन मंगळवारी (15 ऑगस्ट) मित्राबरोबर चित्रपट पाहण्यासाठी गेला होता. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास चित्रपट पाहून तो बाहेर पडला. त्यावेळी हल्लेखोर चित्रपटगृहासमोर दबा धरुन बसले होते. हल्लेखोरांनी नितीनवर कोयता, तलवारीने हल्ला चढविला. गंभीर जखमी झालेल्या नितीनच्या डोक्यात दगड घालून हल्लेखोर पसार झाले. नितीन याचा जागीच मृत्यू झाला होता. तरुणावर हल्ला झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर चित्रपटगृहाच्या परिसरात खळबळ उडाली आहे.