नवी दिल्ली – मारुती सुझुकी डिझेल कारपेक्षा पेट्रोल कारवर अधिक लक्ष देणार असल्याचे या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सूचित केले. 2023 मध्ये उत्सर्जनाचे नवीन नियम लागू होणार आहेत. अशा अवस्थेमध्ये ग्राहक डिझेल ऐवजी पेट्रोल कार खरेदी करण्याची शक्यता या कंपनीला वाटते. वाहन क्षेत्राची एकूण परिस्थिती पाहता आगामी काळात डिझेल कार अधिक विकल्या जाण्याची शक्यता कंपनीला कमी वाटते असे कंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सी व्ही रामन यांनी सांगितले.
2013 -14 मध्ये एकूण कार विक्रीत डिझेल कारची संख्या 60 टक्के इतकी होती. ती आता 17 टक्क्यावर आली आहे. या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. पेट्रोल कार कमी उत्सर्जन करतात व अधिक कार्यक्षम काम करतात. त्यामुळे आम्ही आगामी काळात या क्षेत्रावरील तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले.