मारुती, महिंद्रा, टोयोटाच्या विक्रीत घट

नवी दिल्ली – गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील वाहन विक्री कमी झाली आहे. यातून या क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्‍यता दिसून येत नाही. शनिवारी मे मधील वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर झाली. यात बहुतांश कंपन्यांच्या वाहन विक्रीत मोठी घट झाली आहे.

मारुती सुझुकी कंपनीच्या वाहन विक्रीत 22 टक्‍क्‍यांची घट होऊन ती केवळ 1,34,641 युनिट एवढी झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने 1,72,512 कार विकल्या होत्या. कंपनीची देशांतर्गत विक्री मे महिन्यात 23 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 1,25, 552 एवढी झाली आहे. गेल्या वर्षी कंपनीने देशात 1,632,200 कार विकल्या होत्या. मे महिन्यात कंपनीची निर्यात 2.4 टक्‍क्‍यांनी कमी होऊन ती केवळ 9,089 एवढी झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीने 9312 वाहनांची निर्यात केली होती.

महिंद्रा कंपनीच्या विक्रीतही 3 टक्‍क्‍यांची घट होऊन 45,421 एवढी मर्यादित राहिली. गेल्या वर्षी मे महिन्यात कंपनीला 46,848 वाहने विकण्यात यश मिळाले होते. कंपनीची देशांतर्गत विक्री 1.7 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 43,056 एवढी झाली आहे. कंपनीची निर्यात 21 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 2365 एवढी झाली आहे.

कंपनीचे वाहन विभागाचे अध्यक्ष राजन वढेरा यांनी सांगितले की, निवडणुकीचा काळ असल्यामुळे ग्राहकांनी वाहन खरेदी कडे लक्ष दिले नाही. आता केंद्रात स्थिर सरकार आले आहे त्यामुळे वाहन विक्री वाढेल. टोयोटा किर्लोस्कर मोटर या कंपनीच्या विक्रीतही मे महिन्यात सहा टक्‍क्‍यांची घट झाली आहे. या महिन्यात कंपनीने 13,066 वाहने विकली. गेल्या वर्षी कंपनीने मे महिन्यात 13,940 वाहनांची विक्री केली होती. देशांतर्गत विक्रीत 7.4 टक्‍क्‍यांची घट झाली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीच्या निर्यातीत ह्या महिन्यात घट झाली आहे. किर्लोस्कर मोटार कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक डी. राजा यांनी सांगितले की, निवडणुका, भांडवल असुलभता, विम्याचा वाढलेला खर्च, इंधनाचे वाढलेले दर या कारणामुळे ग्राहक वाहन खरेदीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. मात्र, आम्ही आगामी काळाबाबत आशावादी असल्याचे त्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.