गंगटोक – सिक्कीममध्ये 24 वर्षांनंतर सत्तापालट होताच नवे नियम व कायदे लागू होण्यास सुरुवात झाल्याचे दिसत आहे. प्रेमसिंग तमांग ऊर्फ पीएस गोले यांनी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना कामासाठी पाच दिवसांचा आठवडा घोषित केला.
याअगोदर प्रत्येक महिन्याचा दुसऱ्या शनिवारी सरकारी सुट्टी होती. मात्र, आता सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्येक शनिवार, रविवार सुट्टी मिळणार आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यालयीन कामकाजाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी सर्व प्रमुख शासकीय अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली. यानंतर त्यांनी आम्ही आमचे निवडणूक काळात दिलेले आश्वासन पूर्ण करत असल्याचे सांगत हा निर्णय घेतला. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळालेल्या अतिरक्त सुट्टीचा उपयोग त्यांना आपल्या आरोग्याकडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांकडे लक्ष देण्यासाठी होईल असे मुख्यमंत्री गोले यांनी सांगितले.
तसेच, माझ्यासह माझ्या सरकारमधील मंत्री व आमदार कोणत्याही प्रकारचे लक्झरी वाहन वापरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महागड्या वाहनांवर खर्च करण्यापेक्षा हा पैसा जनतेसाठी वापरला गेला पाहिजे, असे त्यांचे मत आहे. त्यांनी संपूर्ण सरकारी यंत्रणेला एक कुटुंब म्हणून काम करण्याचे आणि प्रत्येक वेळी प्रशासकीय कामकाजात एकमेकांना पाठिंबा देण्याची विनंती केली.