कामेरी – कराड उत्तर मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुखपदी मनोजदादा घोरपडे यांची नियुक्ती केल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे जाहीर केले. श्री. बावनकुळे बुधवारी जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी ही घोषणा केली. बावनकुळे यांनी काल कराड येथे वेणूताई चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमांमध्ये कराड उत्तरमध्ये निवडणूक प्रमुख व प्रभारी म्हणून मनोजदादा घोरपडे असतील असे जाहीर केले. यावेळी अतुल भोसले, विक्रम पावस्कर, जिल्हाध्यक्ष धर्यशील कदम, विक्रांत पाटील, मुरलीधर मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवण्यासाठी पक्षाने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. त्याअनुषंगाने विधानसभा निवडणुकीमध्येसुद्धा प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक प्रमुख नेमण्यात आले आहेत. कराड उत्तरमधून मनोजदादा घोरपडे यांची वर्णी लागण्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहयला मिळत आहे. मनोजदादा घोरपडे यांच्या नेतृत्वामध्ये लोकसभेला व विधानसभेला कराड उत्तरमधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. यावेळी रामकृष्ण वेताळ, रवी अनासपुरे, मकरंद देशपांडे, सागर शिवदास, महेश जाधव, चंद्रकांत मदने, एकनाथ बागडी, धनंजय पाटील, विठ्ठल बलशेटवार व पदाधिकारी उपस्थित होते
मनोजदादांना निवडून आणण्याचा निर्धार
निवडणूक प्रमुख हेच त्या मतदारसंघाचे उमेदवार असल्याने मनोजदादा घोरपडे यांच्या नावाची घोषणा होताच सर्व कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या निर्णयाचे स्वागत केले. कराड उत्तरमधून मनोजदादा घोरपडे यांना निवडूनच आणणार असा संकल्प यावेळी करण्यात आला. यावेळी “जय श्रीराम, भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी सभागृहात जल्लोष केला.