मुंबई – पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय तर मॅंचेस्टर युनायटेडचा लीग स्पर्धेतील स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या मॅंचेस्टर युनायटेड संघाने पुढील वर्षीच्या आयपीएल स्पर्धेतील दोन नव्या संघांपैकी एक संघ विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. फुटबॉलच्या बरोबरीने क्रिकेटला जागतिक लोकप्रियता असून त्यामुळेच आता जागतिक स्तरावरचे क्लब मालक या स्पर्धेकडे आकर्षित होत आहेत.
पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत दोन नवे संघ दाखल होणार आहे. या संघांच्या खरेदीसाठी बीसीसीआय लवकरच लिलावाचे आयोजन करणार आहे. या दोन नव्या संघांपैकी एक संघ विकत घेण्यासाठी मॅंचेस्टर युनायटेड संघाचे मालक असलेल्या ग्लेजर समूहाने संघ विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मॅंचेस्टर युनायटेड संघाच्या मालकांना जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीग क्रिकेटमध्ये आपला संघ असावा ही कल्पना सुचली आहे. मात्र, या लिलावात त्यांनी संघ खरेदी केला तर त्यापूर्वी त्यांना या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी भारतात एका संस्थेची स्थापना करावी लागेल. मॅंचेस्टर युनायटेडने परदेशी गुंतवणूकदारांसाठी असलेली अट पूर्ण केली तरच ते लिलावासाठी पात्र ठरतील.
आयपीएलच्या लिलावाबाबत निविदा घेण्यासाठी एकूण 12 संस्थांनी तयारी केली आहे. त्यात मॅंचेस्टरचीही भर पडणार आहे. दोन नव्या संघांची लिलावातील बेस प्राईज 2 हजार कोटी रुपये ठेवण्यात आली असली तरी प्रत्यक्ष लिलावात यापेक्षा दुपप्ट किंवा तिप्पट बोली लागण्याची शक्यता आहे.