मुंबई – बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मॅनेजरची आज तिसऱ्यांदा चौकशी केली. वांद्रे पोलीस ठाण्यात मॅनेजर सिद्धांत पिठानी आज चौकशीसाठी हजर झाला होता. यानंतर त्याची सखोल चौकशी करण्यात आली. सिद्धांत पिठानी हा सुशांतच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक होता.
विशेष म्हणजे तो शेवटपर्यंत सुशांतसोबत होता. त्यामुळे त्याच्याकडून पोलीस महत्त्वाची माहिती घेत आहेत. यामुळे तपासाला वेग आल्याचे दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत एकूण 16 जणांचे जबाब घेतले आहेत. यात त्याच्या गर्लफ्रेंडपासून तर अगदी घरातील नोकरांपर्यंतचा समावेश आहे.
दरम्यान, आज या प्रकरणात सुशांतची कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट प्रियांका खिमानी हिचाही जबाब वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. मात्र, पोलीस ठाण्याबाहेर आल्यानंतर प्रियांका यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.