पळसदेव, (वार्ताहर) – आधी आमच्या लाईटचा प्रश्न मार्गी लावा, मग तुमच्या मताचे बघू यापूर्वी आम्ही तुम्हाला साथ दिली आणि यापुढेही देऊ; मात्र आमचा विजेचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे आवश्यक आहे. अन्यथा वेगळा विचार करावा लागेल अशा संतप्त भावना माळेवाडी येथील नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे व माजी सभापती प्रवीण माने यांच्यासमोर व्यक्त केल्या.
पळसदेव भागातील माळेवाडी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भरणे माळेवाडी येथे आले असताना नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. गेल्या अनेक दिवसांपासून माळेवाडी येथील रखडलेली विकासकामे याबाबत येथील तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
यावेळी येथील युवकांनी माळेवाडी येथील विजेचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असल्याचं भरणे यांच्या निदर्शनास आणून दिले. अगदी घरातील फ्रिज, मोबाईल चार्जर, फॅन, मिक्सरसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील या कमी व्होल्टेज लाइटमुळे व्यवस्थित नसल्याचे नागरिकांनी सांगितलं. इतर भागात वीज चांगल्या दाबाने व व्यवस्थित मिळते; मात्र माळेवाडीवरच हा अन्याय का? आम्ही तुमचे मतदार नाही का? असा संतप्त सवालही यावेळी नागरिकांनी उपस्थित केला.
यावेळी विलास शेलार यांनी माळवाडी येथील प्रलंबित कामांची यादीच भरणे यांच्याकडे दिली व तातडीने ही काम मार्गी लावण्याची मागणी यावेळी उपस्थिती युवकांनी केली. आमचे कामे मार्गी लागल्यास आम्ही नक्कीच महायुतीच्या उमेदवाराला साथ देऊ अशी ग्वाही यावेळी माळेवाडी येथील मतदारांनी दिले. यावेळी माने यांचे यांचे भाषण सुरू असताना आम्ही तुमच्यासोबत नाही आम्हाला गृहीत धरू नका असे स्पष्ट शब्दात कार्यकत्यांनी सांगितले.
दोन्ही बैठकांना एकच कार्यकर्ते
सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्या घोंगडी बैठकीला एकच कार्यकर्ते उपस्थित असल्याचे पाहायला मिळालं त्यामुळे हे कार्यकर्ते नेमके कुठल्या बाजूचे हाच प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला. आता हे मतदार आपलं मतदान कोणाच्या पारड्यात टाकणार हे मात्र येणारी वेळच ठरवेल.