पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पोलिसांतील तक्रार मागे घेण्यासाठी २५ लाखांची खंडणी स्वीकारताना मुंबईतील रिअल इस्टेट व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई एनआयबीएम रोडवरील क्लोअर हिल्स प्लाझा येथे करण्यात आली. याबाबत रेडियंट गार्ड सर्व्हिसेस प्रा. लि. या सिक्युरिटी एजन्सीचे मालक कर्नल नविंदर सिंह बेवली (४६, रा. कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे.
विजय जतन लोंढे (रा. मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर अमर कसबे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोंढे याचा रिअयल इस्टेचा व्यवसाय आहे. तर अमर कसबे हा एका राजकीय पक्षाचा महाराष्ट्र सचिव असल्याचे ओळखपत्र पोलिसांना मिळाले आहे. आरोपींनी फिर्यादी यांच्या कंपनीविरुद्ध पोलीस ठाण्यात अनेक तक्रार अर्ज केले आहेत.
तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी अमर कसबे याने सोमवारी फिर्यादी यांना व्हॉट्सअॅप कॉल करुन २५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यावेळी फिर्यादींनी तक्रार अर्जाचे काय करणार, अशी विचारणा केली असता त्याने तक्रारी अर्ज मागे घेतल्याचे लेखी पाठवतो, असे सांगून दुपारी बाराच्या सुमारास तक्रार अर्ज मागे घेतल्याचे व्हॉट्सअॅपवर पाठवले.
त्यानंतर फिर्यादी यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार कोंढवा पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपी विजय लोंढे हा फिर्यादी यांच्या ऑफिसजवळ येऊन थांबला होता. आरोपी अमर कसबे याने बेवली यांना फोन करुन माणूस ऑफिसच्या खाली थांबल्याचे सांगितले.
त्यानुसार बेवली यांनी एका बॅगेत ५० हजार व कागद भरले. बॅग विजय लोंढे याच्याकडे दिली. फिर्यादी यांच्याकडून पैशांची बॅग घेताना विजय लोंढे याला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ही करावाई सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर, पोलीस अंमलदार गणेश चिंचकर, अभिजीत जाधव,सोमनाथ महानवर आणि तुषार डिंबाळे यांच्या पथकाने केली.