पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गेल्या काही वर्षांत शहरात वाढलेल्या नवीन बांधकामांमुळे महापालिकेस बांधकाम विकसन शुल्कातून विक्रमी उत्पन्न मिळालेले आहे. या नवीन बांधकामांमुळे मिळकतकर विभागालाही “बूस्ट’ मिळाला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात महापालिकेच्या कर संकलन विभागाकडे नवीन ५३ हजार मिळकतींची नोंद झाली. त्यातून तब्बल १३० कोटींचा महसूल जमा झाला आहे. तर पुढील काही वर्षांत ही मिळकतींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या मिळकतकर विभागाकडून बांधकाम विभागाने दिलेले भोगवटा पत्र तसेच महावितरणकडे नव्याने नोंदणी झालेल्या मीटरची माहिती घेत शहरातील नवीन मिळकती शोधल्या जातात. त्यानंतर त्यांना कर आकारणी केली जाते.
दरवर्षी हे प्रमाण २५ ते ३० हजारांच्या आसपास असते. मात्र, मागील वर्षी हा आकडा तब्बल ५३ हजारांवर गेला आहे. तर या वर्षी या विभागास सुमारे २,४०० कोटींचे उद्दिष्ठ दिलेले असून या विभागास ते पूर्ण करण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
कराची अपेक्षा मोठी
नवीन आकारणी केलेल्या मिळकतीमध्ये निवासी मिळकती ४७ हजार ८१९ असून, त्यातून ६३ कोटी महापालिकेकडे जमा झाले आहेत. मात्र, १२४ कोटी मिळणे अपेक्षित होते. नवीन आकारणी केलेल्या मिळकतीमध्ये बिगर निवासी मिळकती या २ हजार ३२४ इतक्या आहेत. यातून महापालिकेकडे ६८ कोटी जमा असून, महापालिकेस ११८ कोटींचा कर अपेक्षित होता.