माले, (मालदीव) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे निलंबित झालेल्या मालदीवच्या एका मंत्री महिलेने आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. भारतीय नेतृत्वाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल मालदीवच्या ३ मंत्र्यांना या वर्षाच्या सुरुवातीला निलंबित केले गेले होते. त्यांच्यापैकी मरियम शिउना यांनी अलिकडेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल देखील वादग्रस्त पोस्ट केली होती. मात्र त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
शिउना यांनी ही वादग्रस्त पोस्ट डिलीट केली आहे. भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा आपला हेतू नव्हता. मात्र यामुळे जर कोणाची गैरसमजूत झाली असेल, तर आपण दिलगिर आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
भारताबरोबरच्या खोलवर रुजलेल्या संबंधांचा आणि दोन्ही देशांमधील परस्पर सामंजस्याचा मालदीवला आदर आहे, असे त्यांनी म्हटले आहे. भविष्यात पोस्ट करताना आपण अधिक काळजी घेऊ असेही त्यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मालदीवमधील विरोधी पक्ष असलेल्या एमडीपीला प्रतिक्रीया देताना केलेल्या पोस्टमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाशी साधर्म्य असलेली प्रतिमा आपल्याकडून पोस्ट केली गेली होती. मात्र आपला हेतू भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा मुळीच नव्हता, असे स्पष्टिकरणही शिउना यांनी दिले आहे.
त्यांनी केलेल्या वादग्रस्त पोस्टमध्ये मालदीवमधील विरोधी पक्ष असलेल्या मालदीवन डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रचार मोहिमेच्या पोस्टरवर अशोक चक्राच्या जागेवर पक्षाचा लोगो वापरण्यात आला होता.
जानेवारी महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल मरियम शिउना यांच्यासह मलाशा शरीफ आणि महझूम मजिद या तीन मंत्र्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले होते. पंतप्रधान मोदींनी लक्षद्विपमधील पर्यटन उद्योगाला प्रोत्साहन देणारी पोस्ट केल्यानंतर या तिघांनी मोदींबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती. मालदीवमधील भारतीय उच्चाधिकार् यांनी याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांना निलंबित केले गेले होते.
मोहम्मद मुइझ्झू हे मालदीवचे अध्यक्ष झाल्यापासून भारत आणि मालदीव दरम्यानचे संबंध ताणले गेले आहेत. मालदीवमध्ये तैनात सुरक्षा रक्षक हटवण्याची विनंती मुइझ्झू यांनी केली. तर दुसरीकडे भारताकडे कर्जाच्या फेरनियोजनाची मागणीही त्यांनी केली होती.