कोलोंबो – श्रीलंकेत पोलिसांनी अमली पदार्थांची तस्करी करणार् यांवर मोठी कारवाई केली आहे. आठवडाभर चाललेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी तब्बल १३ हजार ६६६ जणांना अटक केली आहे. त्यापैकी ७१७ जणांना रोठडीमध्ये ठेवण्याचे आदेश न्यायालयाकडून मिळवले जात आहेत.
ताब्यात घेतलेल्या या सर्वांपैकी १७४ जणांच्याविरोधात बेकायदेशीरपणे खरेदी केलेली मालमत्ता बाळगण्यासंदर्भात तपास सुरू आहे. याशिवाय १,०९७ जणांना पुनर्वसन केंद्मध्ये पाठवण्यात आले आहे, असे अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे.
आठवडाभर सुरू असलेल्या मोहिमेदरम्यान ४,६८५ संशयितांपैकी १,१०७ संशयितांना नार्कोटिक्स ब्युरोने ताब्यात घेतले आहे. श्रीलंकेचे नवीन पोलीस प्रमुख देशबंधू तेन्नाकून यांनी या मोहिमसाठी पुढाकार घेतला आहे. तेन्नाकून यांनी याच महिन्याच्या सुरुवातीला अवघ्या ३ महिन्यांसाठी देशाच्या पोलीस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला आहे.
तेन्नाकून यांची आतापर्यंतची कारकिर्द वादग्रस्त राहिली आहे. त्यांच्या कामाबाबत नेहमीच कायदेशीर कटकटी सुरू राहिल्या आहेत. अलिकडेच १४ डिसेंबर रोजी तेन्नाकून आणि त्यांच्या ३ सहकार् यांना २०११ मधील एका प्रकरणी एका पीडीत व्यक्तीला नुकसान भरपाई देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.