काबूल – पाकिस्तानमधील निमरुझ भागातल्या खाशरोड जिल्ह्यामध्ये झालेल्या हवाई हल्ल्यामध्ये 9 पाकिस्तानी दहशतवादी आणि 5 तालिबानी दहशतवादी मारले गेले. तर अन्य 6 तालिबानी दहशतवादी जखमी झाले आहेत.
अफगाणिस्तानच्या हवाई दलाने रविवारी हा हवाई हल्ला केला. या हल्ल्यामध्ये नागरीकही मारले गेले असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्याची शहानिशा केली जात आहे, असे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
अफगाण राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण दलाने मंगळवारी बागलान प्रांतातील झामनखाईल चष्माईशायर भागात दहशतवाद्यांच्याविरोधात केलेल्या प्रतिकाराच्या कारवाईमध्ये 7 तालिबानी दहशतवादी मारले गेले तर अन्य 6 जण जखमी झाले आहेत, असे संरक्षण मंत्रालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अफगाणिस्तानमध्ये गेल्या दशकभरापासून सुरू असलेली युद्धग्रस्त स्थिती संपवण्यासाठी तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये दोहा इथे चर्चा सुरू आहे. मात्र तरिही दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण कमी झालेले नाही. म्हणून अफगाणिस्तान सरकारने कठोर भूमिका घेऊन ही कारवाई केली आहे.