जिनिव्हा – अनेक देशांमध्ये करोना विरोधी लसीकरणाला सुरुवात होते आहे. मात्र तरिही या वर्षभरात सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्याची शक्यता नाही, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख संशोधकांनी म्हटले आहे.
सोमवारी प्रसिद्धी माध्यमांबरोबरच्या वार्तालापादरम्यान डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी हा इशारा दिला आहे. लसीकरण होत असलेल्या देशांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन अतिशय कसोशीने केले जायला हवे. तरच करोना विरोधी लसीचा परिणाम दिसून येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
अलिकडच्या आठवड्यांत ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी, इस्त्राईल, नेदरलॅंड्स आणि इतर देशांनी आपल्या कोट्यावधी नागरिकांना करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी लस देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे एकप्रकारची निष्काळजी निर्माण होण्याची शक्यता आहे.
जरी लस दिली गेली तरिही 2021 मध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती निर्मण होऊ शकणार नाही. जरी काही देशांत अगदी निवडक ठिकाणी जरी अशी सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली, तरी त्यामुळे जगभरातील लोकांचे रक्षण होणार नाही, असे स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लोकसंख्येतील 70 टक्के लोकसंख्येमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण होणे आवश्यक असते. तरच संपूर्ण लोकसंख्येला प्रतिकारशक्तीचा लाभ मिळू शकतो. कोविड-19 सारख्या अतिशय संसर्गजन्य रोगाला आटोक्यात आणण्यासाठी 70 टक्क्यांपेक्षा अधिक लोकसंख्येमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होणे गरजेचे आहे, असे संशोधकांचे मत आहे.
करोना विरोधी लसीकरणामुळे या महिन्यात किंवा फेब्रुवारीमध्ये काही देशांमध्ये सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास सुरुवात होईल. मात्र जगभरातील सर्वच देशांमध्ये लसीकरण व्हावे, याची काळजी जागतिक समूदायाने घ्यायला हवी, अशी अपेक्षा जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांचे सल्लागार ब्रुस आयलवर्ड यांनी व्यक्त केली आहे. लस सर्व देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी लसींचे उत्पादकांचे सहकार्य मिळणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.