केंदुर (पुणे) – केंदुर-पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये सर्वच गावांतील प्रमुख नेत्यांच्या नजरा सरपंच आरक्षणाकडे लागल्या होत्या. शुक्रवारी (दि. 29) अखेर शिरूर तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले. यामध्ये करंदी, जातेगाव खुर्दमध्ये पुन्हा महिलाराज आले आहे. तर मुखई, धामारी, पाबळ, केंदुर, वढू बुद्रूकला सर्वसाधारणसाठी आरक्षण पडले आहे. त्यानंतर अनेकांनी सरपंचपद मिळवण्यासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.
राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटेंच्या पाबळ गावात शिवसेनेच्या सोपान जाधव यांनी स्वतः आणि पत्नीसह 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पाबळ ग्रामपंचायतवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. पाबळ ग्रामपंचायतचे सरपंचपद हे सर्वसाधारण जागेला आल्याने सोपान जाधव यांचे वर्चस्व ग्रामपंचायतीवर पुन्हा पाहायला मिळणार आहे. तर जातेगाव बुद्रूक मध्ये शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार आणि पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष उमाप यांनी एकमेकांना आव्हान देत ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल उभे केले होते, मात्र प्रकाश पवार यांच्या नेतृत्वाखाली पुतण्या राहुल पवार यांच्यासह 9 जागांपैकी 5 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे प्रकाश पवार यांचा गावच्या राजकारणातही करिष्मा कायम असल्याची चर्चा रंगली आहे. तर शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर जांभळकर यांच्या करंदी गावात पाच वर्षांच्या विश्रांतीनंतर पुन्हा ग्रामपंचायतवर राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली आहे. गेली पाच वर्षे करंदी ग्रामपंचायतवर अनुसूचित जातीच्या महिला सरपंच होत्या. यावेळीदेखील सरपंचपदाची जागा नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने सुभद्रा कांतीलाल ढोकले यांच्या नावाची सरपंच पदासाठी जोरदार चर्चा आहे.
दरम्यान मुखई ग्रामपंचायत निवडणुकीत माजी आमदार सूर्यकांत पलांडे आणि शिवसेना नेत्या जयश्री पलांडे या दोघांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या पॅनलला मात्र पराभव पत्करावा लागला. मुखई ग्रामपंचायतीचे सरपंचपद सर्वसाधारणसाठी असल्याने नक्की कोण सरपंच होणार? याकडे मुखई ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर पंचायत समितीच्या उपसभापती सविता पऱ्हाड यांचे पती प्रमोद पऱ्हाड यांची केंदुर ग्रामपंचायतीवर बिनविरोध निवड झाली असली तरी केंदुर ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवण्यापासून पऱ्हाड परिवाराला रोखण्यात थिटे, साकोरे यशस्वी ठरले. केंदुर ग्रामपंचायतीचे सरपंचपद देखील सर्वसाधारण जागेसाठी असल्याने सरपंचपदासाठी चढाओढ पहायला मिळणार आहे.
इकडे वढू बुद्रूकमध्ये माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे खंदे समर्थक आणि भाजपचे पदाधिकारी प्रफुल्ल शिवले यांनी पत्नीला विजय मिळवून देत ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली. वढू बुद्रूक ग्रामपंचायतीवर देखील सर्वसाधारण जागेचा सरपंच निवडला जाणार आहे. त्यामुळे प्रफुल्ल शिवले यांचे नेतृत्त्व गावच्या राजकारणात पुन्हा अधोरेखित झाले आहे.
जातेगाव खुर्दमध्ये प्रस्थापित राजकारण्यांच्या विरोधात युवकांनी सत्ता मिळवली आहे, तर सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने पुन्हा जातेगाव खुर्दमध्ये महिला राज पहायला मिळणार आहे.
- केंदुर पाबळ गटातील सरपंच आरक्षण
सर्वसाधारण पुरूष- पाबळ, केंदुर, धामारी, वढू बुद्रूक, मुखई, आपटी, खैरेनगर.
सर्वसाधारण महिला- जातेगाव खुर्द, खैरेवाडी, हिवरे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष- जातेगाव बुद्रूक.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- करंदी, वाजेवाडी
अनुसूचित जाती महिला- पिंपळे जगताप.