मुंबई : विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करून नवीन संकल्पना आणि नाविन्यता यावर विशेष लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करीत असताना काही अडचणी येऊ शकतात. परंतु, गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे, विद्यार्थी हितासाठी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचाविण्यासाठी विशेष प्रयत्न करावा, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
राजभवन येथे राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या संयुक्त मंडळाची बैठक राज्यपाल कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, उपसचिव अजित बाविस्कर,उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, शैक्षणिक शुल्क समितीचे अध्यक्ष विजय अचलिया, माजी मुख्य सचिव जे.पी. डांगे व सर्व विद्यापींठाचे कुलगुरू उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी म्हणाले, त्या त्या भागातील भौगोलिक परिस्थितीनुसार गुणवत्तापूर्ण शिक्षण सहज आणि सुलभ उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. यासाठी सर्वांचे मार्गदर्शन आणि साथ महत्त्वाची आहे, शैक्षणिक अडचणी आणि त्यावर उपाययोजनांसाठी विद्यापीठ आणि राज्य शासन यांनी समन्वयातून कार्य करावे, असेही राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितले.
परीक्षा, निकाल आणि शैक्षणिक वेळापत्रक याचे नियोजन करावे – मंत्री चंद्रकांत पाटील
विद्यापीठ आणि महाविद्यालयाचे परीक्षा वेळापत्रक, परिक्षेचे निकाल वेळेत जाहीर करणे, सीईटी प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करून शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व विद्यापीठांनी नियोजन करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
Jammu Kashmir : गुलाम नबी आझादांना मोठा धक्का; पक्षातील 17 नेत्यांचा पुन्हा कॉंग्रेस पक्षात प्रवेश
नवीन शैक्षणिक धोरणानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम, पुस्तक, शैक्षणिक साहित्य मराठीमध्ये उपलब्ध होण्यासाठी आयआयटी मुंबईच्या ‘उडाण’ प्रकल्पाबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि आयआयटी मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे.