Tennis C’Ships 2024 – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक सेवा विभाग यांच्या संलग्नतेने आयोजित पीएमआरडीए पुरस्कृत महा ओपन एटीपी चॅलेंजर पुरूष आंतरराष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुसऱ्या फेरीत एकेरीत भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या निकी कलियांदा पोनाचा याने अव्वल मानांकित खेळाडू भारताच्या सुमित नागल याचा ६-४, ६-३ असा पराभव करून सनसनाटी विजयासह आगेकूच केली.
तर, दुहेरीत भारताच्या अर्जुन कढे व जीवन नेद्दुचेझियन, साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. एकेरीत रशियाच्या अलेक्सी झाखारोव्ह याने भारताच्या वाईल्ड कार्ड द्वारे प्रवेश केलेल्या रामकुमार रामनाथनचा ६-४,६-४ असा पराभव केला. हा सामना १ तास २७ मिनिटे चालला.
पुणे मेट्रोपोलिटन रिजनल डेव्हलमेंट ऑथोरीटी (पीएमआरडीए) यांनी प्रायोजित ही स्पर्धा भारतातील एटीपी चॅलेंजर मालिकेतील तिसरी स्पर्धा आहे. यापूर्वीच्या दोन स्पर्धा बंगळुरू आणि चेन्नई येथे पार पडल्या आहेत.
दुहेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या अर्जुन कढे व जीवन नेद्दुचेझियन या अव्वल मानांकित जोडीने जर्मनीच्या जेकॉब स्नॅटर व मार्क वॉलनर यांचा 6-4 ,7-66) असा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. भारताच्या साकेत मायनेनी व रामकुमार रामनाथन यांनी क्रोएशियाच्या दुजे अजदुकोविक व इटलीच्या एनरिको डल्ला व्हॅले यांचा 6-2, 6-7(4), 10-2 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.