नवी दिल्ली : तब्बल तेरा लाख कर्मचारी असणाऱ्या बलशाली अशा भारतीय लष्कराचे पुढील प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे असतील, असे सरकारच्या वतीने सोमवारी जाहीर करण्यात आले. नरवणे सध्या लष्कराचे उपप्रमुख आहेत.
लष्करप्रमुख बीपीन रावत हे 31 डिसेंबर रोजी निवृत्त होत आहेत. नरवणे यांनी लष्कर उपप्रमुख पदाची धुरा सप्टेंबरमध्ये सांभाळली. त्यापुर्वी ते चीन बरोबर चार हजार किमी सीमेवर लक्ष ठेवणाऱ्या पूर्व कमांडचे प्रमुख होते. आपल्या 37 वर्षांच्या सेवेत नरवणे यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले. शांती मोहिमांतही त्यांचा समवेश होता. जम्मू काश्मिर आणि ईशान्य भारतात त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची कामगिरी बजावली. जम्मू काश्मिरमध्ये ते राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख होते. श्रीलंकेतील शांती सेनेत त्यांचा सहभाग होता. म्यानमारमधील भारतीय दुतावासाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे अनेक वर्ष होती.
त्यांनी शीख इनफ्रंट्री रेजिमेंटमधून जुन 1980मध्ये सेवेस सुरवात केली. जम्मू काश्मिरातील उल्लेखनीय कामगिरीबाबात त्यांना सेना मेडल प्रदान करून गौरवण्यात आले आहे. नागालॅंडमध्य कार्यरत असताना त्यांना अतिविशिष्ठ सेवा पदकाने गौरवण्यात आल होते.