नवी दिल्ली – संसदेत अधिवेशनात राज्यसभेत गोंधळ घातल्याने विरोधी पक्षांच्या १२ सदस्यांना निलंबित करण्यात आले. निलंबनाच्या कारवाईने राजकीय वातावरण तापल्याचे दिसत आहे. त्या विरोधात हे खासदार संसदेच्या आवारात महात्मा गांधीच्या पुतळ्यासमोर आंदोलन करत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि सपा खासदार जया बच्चन मंगळवारी १२ निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनाला भेट दिली होती. त्यांच्या समवेत शिवसेना खासदार संजय राऊत, माजी केद्रिय मंत्री प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.
यावेळी निलंबित राज्यसभा खासदारांच्या धरणे आंदोलनास्थळी शरद पवार दाखल झाल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांना बसण्यासाठी खुर्ची आणून दिली. या प्रसंगाचा फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होत आहे.
यावरून आता विरोधी पक्ष नेत्यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. भाजप नेते अतुल भातखळकर ट्विट केले आहे की,’ धरणे आंदोलन करणाऱ्या संसदेतील निलंबित खासदारांना भेटण्यासाठी ज्येष्ठ नेते गेले तेव्हा त्यांना खुर्ची देण्यासाठी सुरू असलेली संजय राऊत यांची लगबग पाहा. आम्हाला उगीच वाटत होते की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे राऊतांचे गुरू. पण खरे गुरू शरद पवारच, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.