वाघोली – लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाघोली परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजप नेते संदीप सातव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती. दैनिक प्रभातने (दि. १७) रोजी बातमी प्रसिद्ध करून या प्रश्नाला वाचा फोडली होती.
लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस चौकीचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डोमखेल तालुका हवेली येथील बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्री प्रकरणी गौरव सातव (रा. डोमखेल वस्ती) व त्यांचा कामगार लक्ष्मण कचरू ससाने (रा. डोमखेल वस्ती) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस कर्मचारी विशाल गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याशिवाय वाघोली केसनंद रस्त्यालगत कोणार्क प्लाझा येथील घुले वाईन शॉप समोर दारू पिणाऱ्या व्यक्तींमुळे कोणार्क एक्झोटीका सोसायटी, हिलशायर सोसायटी व इतर केसनंद रोड वरील सोसायटीमधील महिलांना, मुलींना,नागरिकांना रस्त्याने ये जा करताना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्याठिकाणी देखील लोणीकंद पोलिसांनी प्रतिबंधात्मक कायदेशीर कारवाई केली आहे. लोणीकंद पोलीस कडक पावित्र्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.