मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकांची मोर्चेबांधणी प्रत्येक पक्षाने सुरू केली आहे. त्यादृष्टीने प्रत्येक पक्षाने जुळवाजुळव सुरू केली आहे. आता हिंगोलीच्या जागेचीही सध्या चर्चा सुरू आहे. हिंगोलीची जागा शिंदे गटाकडे असून ती जागा भाजप घेण्याची शक्यता आहे. माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार हे भाजपच्या तिकिटावर ही जागा लढविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपप्रणित आघाडी आणि काँग्रेसप्रणित आघाडी अशी लढत होण्याचे चित्र सध्या तरी आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गट यांच्यात जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, त्यावर अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगून या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यावर आवश्यकतेनुसार पारंपरिक जागांची अदलाबदल होऊ शकते, असे संकेतही फडणवीस यांनी यापूर्वी दिले आहेत. त्याच अनुषंगाने हिंगोलीच्या जागेचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही जागा सध्या शिंदे गटाकडे आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शिंदे गटाच्या हेमंत पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. ते विधानसभेवर जाण्यासाठी इच्छूक असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे लोकसभा निवडणुकांनंतर पाच-सहा महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे.
हिंगोलीची लोकसभेची जागा भाजपला हवी आहे. या जागेवर माजी सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याआधी ते भाजप पक्षात अधिकृत प्रवेश करतील, असे सांगण्यात येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच, बुधवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाच्या (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालकपदावरून (एमडी) राधेशाम मोपलवार यांची मुक्तता केली आहे.
मोपलवार यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या पायभूत प्रकल्पांसह महत्त्वाकांक्षी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाची उभारणी केली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून मोपलवार यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीला विरोध होण्याची शक्यता नाही.