नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने घेतला आहे. कॉंग्रेसने उत्तर प्रदेशात १७ जागा लढवाव्यात याबाबत या दोन्ही पक्षांमध्ये सहमती झाली आहे. सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीच सहमती झाल्याची घोषणा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अखिलेश यादव बनारस येथून आपला उमेदवार मागे घेणार आहेत तर कॉंग्रेसनेही आता मुरादाबाद जागेसाठीचा आग्रह सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेठी, रायबरेली, प्रयागराज, कानपूर, झाशी, सीतापूर, अमरोहा, गाझियाबाद, सहारनपूर, लखीमपूर खीरी आणि श्रावस्ती या जागा कॉंग्रेस पक्षाने मागितल्या होत्या. प. उत्तर प्रदेशात बुलंदशहर सोडण्याची तयारही कॉंग्रेसने दर्शवली. झालेल्या समझोत्यानुसार आता अखिलेश बनारसमधून माघार घेणार असून ती जागा कॉंग्रेसला दिली जाईल. दरम्यान, समाजवादी पक्षाने उत्तर प्रदेशात आतापर्यंत ३२ उमेदवार जाहीर केले आहेत.
प्रियंका गांधींचा फोन –
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज अखिलेश यादव यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यात त्यांनी मुरादाबादच्या जागेसाठी त्यांचा असलेला आग्रह सोडला आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातील बुलंदशहर आणि हाथरस या ज्या दोन जागा अखिलेश यांनी कॉंग्रेसला देऊ केल्या होत्या त्याऐवजी अन्य कोणत्या दोन जागा दिल्या जाव्यात असे प्रियकांनी त्यांना सूचविले होते. मात्र जागावाटपाची घोषणा आजच व्हावी अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
सोनियांचाही हस्तक्षेप –
कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या जागावाटपाचे घोंगडे बरेच दिवस भिजत पडले होते. अखेर प्रियंका गांधी यांच्यासोबतच सोनिया गांधी यांनीही हस्तक्षेप केल्यामुळे प्रश्न मार्गी लागल्याचे सूत्रांनी नमूद केले. प्रियंका यांनी अगोदर राहुल गांधींशी फोनवर चर्चा केली आणि नंतर अखिलेश यांच्याशी त्या बोलल्या.त्यानंतर सोनिया यांचीही एन्ट्री झाली. त्यांनी उत्तर प्रदेशातील आपल्याच पक्षाच्या नेत्यांना अवास्तव मागण्या करण्याचे थांबवा आणि अखिलेश यांच्या मागे उभे राहा अशा सूचना केल्याचे सूत्रांनी म्हटले. त्यानुसार अखेर आता हे दोन पक्ष एकत्र लढण्यासाठी सज्ज झाले.
मध्यप्रदेशातील जागावाटपाविषयीही समझोता –
इंडिया आघाडीतील महत्वाचे घटक असणाऱ्या कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षातील (सप) हातमिळवणीवर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्यात उत्तरप्रदेशप्रमाणेच मध्यप्रदेशातील जागावाटपाविषयीही समझोता झाला. मध्यप्रदेशात लोकसभेच्या २९ जागा आहेत. त्यातील खजुराहो ही एकमेव जागा सप लढवेल. तो पक्ष उर्वरित जागांवर कॉंग्रेसला पाठिंबा देईल. मध्यप्रदेशात नुकतीच विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत एकत्र येण्यासाठी कॉंग्रेस आणि सपमध्ये वाटाघाटी सुरू होत्या.
मात्र, त्यांच्यातील बोलणी फिस्कटली. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने काही काळासाठी दोन्ही पक्षांमधील संबंध ताणले गेले होते. अर्थात, ती तणातणी विसरून कॉंग्रेस आणि सपने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाची चर्चा सुरू केली. त्या चर्चेतील चढ-उतार पार करून अखेर दोन्ही पक्षांमध्ये उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेशातील जागावाटपावर सहमती झाली. त्यानुसार, कॉंग्रेस उत्तरप्रदेशात लोकसभेच्या ८० पैकी १७ जागा लढवणार आहे. इंडिया आघाडीचा विचार करता उत्तरप्रदेशात सप, तर मध्यप्रदेशात कॉंग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल. त्या राज्यांत इंडियामध्ये आणखी काही पक्ष सहभागी होणार का याविषयी उत्सुकता आहे.