पुणे -शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरून लोकल सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. तसेच पुणे रेल्वे स्थानकावर देखील यार्ड रिमोल्डिंगचे काम सुरू होणार असल्याने शिवाजीनगर स्थानकावरून लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. अखेर सोमवारी प्लॅटफॉर्मचे उद्घाटन करण्यात आले. आता शिवाजीनगर स्थानकावरून लोणावळ्यासाठी 4 लोकल सुटणार आहेत.
या टर्मिनसच्या उद्घाटनावेळी खासदार गिरीश बापट हे ऑनलाइन उपस्थित होते. तर, आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि सुनील कांबळे, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेशकुमार सिंह आणि वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी शिवाजीनगर-तळेगाव लोकलला हिरवा झेंडा दाखवला. या टर्मिनसमुळे चाकरमानी, विद्यार्थी आणि व्यापारी यांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, पुणे स्थानकावरून लोणावळ्यासाठी एकूण 20 लोकल सुटत होत्या. त्यापैकी 1 लोकल आधीपासून येथूनच सुटत होती. या कार्यक्रमावेळी डॉ. स्वप्नील नीला, वरिष्ठ मंडळ अभियंता विजयसिंह दडस, जोएल मैकेंजी, मनीष सिंह, स्थानक व्यवस्थापक संजय कुंभार, जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर, लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांची उपस्थिती होती.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक मात्र अनुपस्थित
शिवाजीनगर येथून लोकल सेवा सुरू करण्याचा जिव्हाळ्याचा विषय मार्गी लागला. उद्घाटनावेळी आमदार, अधिकारी उपस्थित होते. मात्र विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे या मात्र गैरहजर होत्या. यामुळे रेल्वे स्थानक, प्रवाशांच्या समस्या, गैरसोयी हे विषय रेल्वे व्यवस्थापक फार गांभीर्याने घेत नसल्याची चर्चा सुरू होती.
असे असेल वेळापत्रक
शिवाजीनगर ते लोणावळा
सकाळी – 6:35 वाजता
सायंकाळी – 5:15 वा.
रात्री – 8:35
आणि 9:05 वा.
लोणावळा-शिवाजीनगर
दुपारी : 3:30 वा.
सायंकाळी 7:00, 7:35
रात्री 10:35 वा