पुणे – राज्यस्तरीय बॅंकर्स समितीचे संयोजक असलेली बॅंक ऑफ महाराष्ट्र व अग्रणी बॅंक व्यवस्थापक, पुणे यांनी सार्वजनिक क्षेत्रातील अन्य संलग्न बॅंकांच्या सहकार्याने 27 ऑक्टोबर कर्ज वितरण कार्यक्रम आयोजित केला. यावेळी 102 ग्राहकांना सुमारे रु 142.63 कोटी रुपयांची कर्जे मंजूर करून वितरीत करण्यात आली.
बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक ए बी विजयकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अर्थ मंत्रालयाच्या निर्देशांनुसार असे कार्यक्रम देशभर आयोजित करण्यात येत असल्याचे विजयकुमार यांनी नमूद केले. बॅंक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक राजेश सिंह यांनी सर्वांचे स्वागत केले. महाराष्ट्र राज्याच्या राज्य स्तरीय बॅंकर्स समितीचे संयोजक एम ए काबरा यांनी कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा अधिकारी अभिजित पाटील, बॅंक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक एम डी कुलकर्णी, कॅनरा बॅंकेचे सरव्यवस्थापक सुबोध कुमार, पुणे जिल्ह्याचे अग्रणी बॅंक व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांच्यासह 12 सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य स्तरीय बॅंकर्स समितीचे सदस्य सचिव राजेश देशमुख यानी आभार मानले