पुणे – राज्य शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे नाव नोंदणी केलेल्या नोकरीइच्छुक बेरोजगार उमेदवारांनी विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करण्याची आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी दिली आहे.
नोकरीसाठी सेवायोजना कार्यालयाकडे नाव नोंदणी केलेल्या बेरोजगार उमेदवारांना सर्व सेवा, सुविधा ऑनलाइन पध्दतीने बेवसाइटच्या माध्यामातून देण्यात येत आहेत. राज्यभरातील वेळोवेळी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध रोजगार मेळाव्याची सर्व माहिती मिळविणे व त्यासाठी उत्सुकता व पसंतीक्रम नोंदविणे, रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून सहभाग मिळविणे, केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास योजना व कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या संस्था यांची माहिती प्राप्त करणे व सहभाग घेणे, आपली शैक्षणिक पात्रता वाढ करणे, पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल यामध्ये दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या उद्योजकांनी वेळोवेळी अधिसूचित केलेली रिक्त पदांची माहिती मिळवून त्यासाठी उमेदवारीचा अर्ज सादर करणे आदी बाबींचा त्यात समावेश करण्यात आलेला आहे.
उद्योजकांनी वेळोवेळी गरज व मागणीनुसार डाऊनलोड केलेल्या उमेदवारांच्या याद्यांमध्ये समावेश होण्यासाठी नोंदणीस आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. अनेक बाबींचा लाभ मिळविण्यासाठी प्रत्येक उमेदवारांनेआपल्या नोंदणीस आधार कार्ड जोडणी करणे गरजेचे आहे. अन्यथा उमेदवार बहुसंख्य संधीपासून वंचित राहू शकतात. प्रत्येक उमेदवाराने तात्काळ सुविधांसाठी स्वत: सक्षम बनून त्याचा लाभ घ्यावा, असे अनुपमा पवार यांनी स्पष्ट केले आहे.
तसेच www.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर जाऊन उमेदवारांनी आपल्या नोंदणी क्रमांकाला आधार कार्ड लिंक करावे, असेही पवार यांनी सांगितले आहे.