पुणे – उसने घेतलेले ५०० रुपये वारंवार परत मागितल्याच्या कारणावरून डोक्यात दगड घालून खून करणाऱ्याला जन्मठेप आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एन. सोनवणे यांनी हा आदेश दिला.
तानाजी बाबूराव पांढरे (वय ४५, रा. सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. बसवराज (वय ३५) असे खून झालेल्याचे नाव आहे. सचिन हनुमंत अलगुडे (वय २८) याने याबाबत फिर्याद दिली आहे. १३ जुलै २०१८ रोजी शिवाजीनगर रेल्वे स्टेशन पंप हाऊससमोर ही घटना घडली.
या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील ऍड. रमेश घोरपडे यांनी काम पाहिले. त्यांनी दहा साक्षीदार तपासले.
सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम यांनी या प्रकरणाचा तपास केला. सहायक पोलीस उपनिरीक्षक विष्णू साळेकर, पोलीस नाईक दत्तात्रय मोरे, पोलीस नाईक निशांत कसबे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. मयत आणि आरोपी दोघेही फिर्यादीच्या वडापावच्या गाड्यावर कामावर होते. आरोपीने मयतकडून ५०० रुपये उसने घेतले होते.
हे पैसे मयत वारंवार परत मागत होता. या कारणावरून चिडून आरोपीने मयतचा खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यावर युक्तिवाद करताना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी ऍड. रमेश घोरपडे यांनी केली. त्यावर सुनावणी करत न्यायालयाने खुनाच्या कलमानुसार शिक्षा सुनावली.