पुणे -परवानगीसाठी गणेश मंडळांनी अर्ज दिल्यानंतर मंडळाच्या जागेची आणि कागदपत्रांची पाहणी करून एक तासातच परवानगी दिली जात आहे. आतापर्यंत पोलिसांकडे जवळपास बाराशे मंडळांचे अर्ज आले असून, त्यातील एक हजार मंडळांना परवानगी देण्यात आली आहे.
गणेशोत्सव मंडळांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार पोलिसांकडून गणेशोत्सव मंडळांना सहकार्याची भूमिका घेण्यात आली आहे. पोलिसांकडून प्रमुख गणेशोत्सव मंडळे, मानाचे गणेशोत्सव मंडळांसह महत्वाच्या गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या, शांतता कमिटी सदस्य व पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या सदस्यांच्या सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह परिमंडळ निहाय उपायुक्त, वाहतूक शाखा व विशेष शाखेचे उपायुक्त यांच्यासमवेत बैठका सुरू आहेत. कर्णिक यांनी परिमंडळ एकच्या उपायुक्त डॉ. प्रियांका नारनवरे यांच्यासमवेत परिमंडळ एक अंतर्गत येणाऱ्या गणेशोत्सव मंडळांची बैठक सोमवारी घेतली.
दरम्यान, गणेशोत्सव मंडळांसाठी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये “एक खिडकी योजना’ सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये स्थानिक पोलीस ठाण्याचे दोन पोलीस, वाहतूक शाखेचे एक व विशेष शाखेचे एक पोलीस अधिकारी व कर्मचारी गणेशोत्सव मंडळांकडून आलेल्या परवानगी अर्जाची दखल घेतात. प्रत्यक्षात मंडळांची पाहणी, त्यांनी दिलेल्या कागदपत्रांची पाहणी करुन त्यांना परवानगी दिली जात आहे. विशेष शाखेकडे आत्तापर्यंत जवळपास बाराशे अर्ज आले आहेत. त्यापैकी एक हजार अर्जांना परवानगी दिली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त आर. राजा यांनी दिली.
गणेशोत्सव मंडळांना त्वरित परवानगी मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या अर्जांची पाहणी करुन परवानगी देत आहेत. परवानगी देण्याबरोबरच वाहतूक व गर्दीची ठिकाणे निवडून त्यावर उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे.
-डॉ. प्रियांका नारनवरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक