पुणे/कात्रज – पुणे शहराच्या दक्षिणेकडील कात्रज डोंगर घाट परिसरात असलेल्या भिलारेवाडी पाझर तलावाच्या रस्त्याच्या बाजूला दोन बिबट्यांचे बछडे निदर्शनास आल्यामुळे शहराच्या वेशीवरच आता बिबट्याचा मुक्तसंचार वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरालगत असलेल्या कात्रज घाट परिसरामध्ये दाट झाडींचे प्रमाण असल्याने या भागांमध्ये बिबट्यांचा वावर वाढला आहे. काही दिवसांपूर्वी कात्रज जुना घाट बोगद्याजवळ एका बिबट्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. आता, गुरुवारी (दि.4) मध्यरात्री बिबट्याचे बछडे दिसल्याने कात्रज घाट परिसरात बिबट्याचा वावर वाढला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
भिलारेवाडी वनविभागा अंतर्गत या भागांमध्ये कात्रज घाट, भिलारेवाडी, गुजर-निंबाळकरवाडी लगत मोठे वनक्षेत्र आहे. दोन दिवसांपूर्वी गुजरवाडी येथील तलाव परिसरात जवळील शेतकरी चौधरी यांच्या वासराचा फडशा बिबट्याने पडला होता.
त्यानंतर वनसेवक संभाजी धनवडे यांना ही माहिती कळविण्यात आली. त्यावेळी पथकाने रात्रीच्या अंधारात शोध घेतला असता या पथकासही बिबटे निदर्शनास आले होते. हे बिबटे पकडण्यासाठी आता उपाययोजना केली जाणार आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.