नारायणगाव – पशुवैद्यकीय डॉक्टरवर बिबट्याने अचानक हल्ला केला. ही घटना रविवारी (दि. 13) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मांजरवाडी जवळील लौकी-कळंब रस्त्यावर घडली. मात्र, डॉक्टर आणि त्यांचे सहकारी यांनी प्रसंगावधान राखल्याने बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यातून वाचले आहेत.
पशुवैद्यकीय डॉ. विशाल गोवर्धन थोरात (वय 38) व त्यांचे सहकारी विजय रामचंद्र थोरात (वय 30 दोघे रा. हिवरे तर्फे नारायणगाव) हे रविवारी कळंब (ता. आंबेगाव) येथे जनावरांवर उपचार करण्यासाठी गेले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डॉ. थोरात सहकारी मित्रांसमवेत दुचाकीवरून लौकी-कळंब रस्त्याने घरी येत असताना लौकी वनविभागाच्या हद्दीत असलेल्या जंगलातून अचानक एका बिबट्याने त्यांच्यावर झडप घातली.
डॉ. थोरात यांनी प्रसंगावधान राखून दुचाकीचा वेग वढवल्याने बिबट्याने केलेला हल्ला त्यांच्या पायावर निभावला. या हल्ल्यात बिबट्याने थोरात यांच्या पायाच्या पोटरीवर चावा घेतला असता मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. त्यांच्या मागे बसलेले विजय थोरात यांनी त्या क्षणाला मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या त्या ठिकाणावरून प्रसार झाला.
या घटनेनंतर डॉ थोरात यांना हिवरे येथील डॉ प्रवीण शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. जुन्नर ग्रामीण रुग्णालयात डॉ. थोरात यांच्यावर उपचार सुरू आहेत