बारामती – शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी “माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत प्रत्येक नागरिकाची बुधवार (दि. 16) आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यासाठी 375 पथके तयार करण्यात आली आहेत. एका पथकाकडून दिवसात 60 ते 75 कुटुंबांची आरोग्य तपासणी होणार आहे. मंगळवारी (दि. 15) या पथकांना आरोग्य तपासणीबाबतचे प्रशिक्षण (ट्रेनिंग) देण्यात येणार आहे.
बारामती शहरात दि.7 सप्टेंबर पासून 14 दिवसांचा ‘जनता कर्फ्यू’ लागू करण्यात आला. ‘जनता कर्फ्यू’चा काही दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत बारामतीकरांच्या आरोग्य तपासणीची संकल्पना पुढे आली. त्यानुसार बुधवार व शुक्रवार या दोन दिवशी ही तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकात ‘बारामती 44 पॅटर्न’मधील दोन स्वयंसेवक कार्यरत असणार आहेत.
- बुधवारी (दि. 16) या प्रभागात तपासाणी
प्रभाग क्रमांक 9 ,10, 11 ,12 15, 16, 18 व 19 ची तपासणी होणार आहे. या दिवशी आढळून आलेल्या रुग्णांना गुरुवार (दि. 17) उपचारार्थ दाखल करण्यात येणार आहे.
- शुक्रवारी (दि. 18) या प्रभागात तपासणी
प्रभाग क्रमांक 8, 1 ,3 ,1 ,4 ,1, 4, 7, 3, 5, 6 या प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी होणार आहे. त्यादरम्यान आढळलेल्या रुग्णांवर शनिवारी (दि. 19) उपचारार्थ दाखल करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठांसाठी रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे. लक्षणे पाहून रुग्णांना तात्काळ सुविधा पुरविल्या जाणार आहेत .
बारामतीकरांनी आरोग्य तपासणीच्यादिवशी घरात राहून निसंकोचपणे आरोग्य तपासणी करून घ्यावी. तपासणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यास सहकार्य करावे. कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती द्यावी. तपासणीद्वारे आढळून आलेल्या रुग्णांवर वेळेत व त्वरित उपचार होणार आहेत. मोहिमेअंतर्गत बारामतीतील करोनाची साखळी तुटण्यास मदत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने ही मोहीम यशस्वी केली जाईल.
– सचिन सातव, गटनेते, नगरपरिषद, बारामती.
या मोहिमेसाठी नगरपरिषद व आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच शिक्षकांची मदत घेतली आहे. वैयक्तिक माहितीचे 15 मुद्दे असलेला एक फॉर्म प्रत्येक नागरिकांकडून भरून घेतला जाईल. तपासणीदरम्यान जास्त तापमान असल्यास तसेच तीनपेक्षा अधिक लक्षणे आढळल्यास त्वरित करोनाची तपासणी करण्यात येईल. त्यासाठी प्रत्येक प्रभागात टेस्टिंग सेंटर उभारणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रतिसाद द्यावा.
– किरणराज यादव, मुख्याधिकारी, बारामती नगरपरिषद