विज्ञानविश्‍व: अलौकिक बुद्धिमत्तेचा लिओनार्डो

डॉ. मेघश्री दळवी

लिओनार्डो दा विंची म्हटले की, कोणाला आठवेल जगविख्यात मोनालिसाचे पोर्ट्रेट, तर कोणाला फ्लोरेन्समधली भित्तीचित्रे, पक्ष्यांच्या उडण्यावरून प्रेरणा घेणारी ऑर्निथॉप्टरची रेखाकृती आठवून कोणाला नवलाई वाटेल, तर कोणाच्या नजरेसमोर येईल त्याचा शरीरविज्ञानाचा अभ्यास. हा अभ्यास जीवशास्त्राच्या जोडीने सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीनेही होता हे महत्त्वाचे. इतक्‍या वेगवेगळ्या कला आणि विज्ञानशाखांमध्ये लीलया संचार करणारा अष्टपैलू लिओनार्डो एकमेवाद्वितीय म्हटला पाहिजे.

इटलीत 15 एप्रिल 1452 रोजी लिओनार्डोचा जन्म झाला आणि 2 मे 1519 रोजी फ्रान्समध्ये त्याचा मृत्यू झाला. या वर्षी त्याची पाचशेवी पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने कला आणि विज्ञान दोन्ही क्षेत्रांमध्ये जगभरात अनेक खास कार्यक्रम आयोजित केले.

आपल्या 67 वर्षांच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण लिओनार्डो भरभरून जगला. चौकस बुद्धी, अचूक निरीक्षण आणि एखाद्या विषयात झोकून देऊन अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे प्रत्येक क्षेत्रात तो चमकला. गणित आणि भूमितीत त्याला उत्तम गती होती. अनेक पृष्ठभाग असलेल्या घन आकृतींची कल्पना करून पहिल्यांदा त्यांची सुरेख रेखाटने केली ती लिओनार्डोने. चौरस तळ आणि त्रिकोणी पृष्ठभाग असलेल्या पाच पृष्ठभागांच्या पिरॅमिडपासून ते बारा पृष्ठीय डोडेकाहेड्रॉनपर्यंतची लिओनार्डोची रेखाटने उपलब्ध आहेत.

फ्लोरेन्समध्ये जन्म आणि तिथेच बालपण गेल्याने लिओनार्डोच्या खूपशा कलाकृती फ्लोरेन्स, रोम आणि वॅटिकनमध्ये पाहायला मिळतात. मात्र त्याच्या अनेक टिप्पणं असलेल्या वह्या आणि रोजनिशा आहेत. त्या इंग्लंडमधल्या विंडसर कॅसलमध्ये. त्यातला एक संच आता बिल गेट्‌सच्या संग्रही आहे. अनेक अभ्यासक त्या टिप्पणांचं निरीक्षण करून थक्‍क होतात. त्यात चित्रकला आणि शिल्पकलेसंबंधी गणिती दृष्टीने विवेचन आहे, दुर्बिणीची कल्पना आहे, पूल, शस्त्रे, हायड्रॉलिक्‍स, स्थापत्यकला, नकाशाच्या विस्तृत नोंदी आहेत आणि वाद्यसंगीतातले प्रयोगदेखील आहेत. ज्या काळात इंजिनाचा शोध लागलेला नव्हता की प्राण्यांशिवाय दुसऱ्या कोणत्याही शक्‍तीचा वापर माणूस करून घेत नव्हता, त्या काळात लिओनार्डोने ऑर्निथॉप्टरची कल्पना केली होती. पक्षी पंखाच्या साहाय्याने उडतात, तर त्याच धर्तीवर आपण कसे उडू शकू याची तपशीलवार रेखाटने पाहून लिओनार्डोच्या अफाट बुद्धिमत्तेचा अंदाज येऊ शकतो.

लिओनार्डोला कोणत्याही विषयाचे वावडे नव्हते. एखाद्या यंत्राच्या भागांचे टाचण असेल तर मध्येच बारीक अक्षरात औषधांविषयी एक छोटी नोंद दिसते. चित्रातल्या छायाप्रकाशाबाबत गणिती मांडणी असेल तर बाजूला “कपाळावर आठ्या पडताना कोणती शीर काम करत असते हे तपासून पाहायला हवे,’ अशी स्वत:लाच करून दिलेली आठवण असते. विज्ञानात कला आणि कलेत विज्ञान शोधणारा लिओनार्डो असा मनमुराद सर्वत्र विहरत असायचा. आज पाचशे वर्षांनंतरही या टिपणांवर अनेक संशोधक काम करत आहेत. लिओनार्डोच्या आकृत्या आणि रचनांमधली प्रमाणबद्धता कधीही ढळत नाही. त्याची लहानात लहान आणि मोठ्यात मोठी आकृतीही सौंदर्याच्या निकषावर कधी कमी पडत नाही. अशी अलौकिक नजर अब्जावधींमधल्या एखाद्यालाच लाभते असे समाजशास्त्रज्ञांचे निरीक्षण आहे. लिओनार्डोच्या बहुतेक कलाकृती आणि शास्त्रीय टिप्पणं आज उपलब्ध आहेत हे आपले सुदैव!

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.