आयएनएलडीमध्येही गळती सुरू; एका खासदाराचा भाजपमध्ये प्रवेश 

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील नामुष्कीजनक पीछेहाटीनंतर विरोधी पक्षांच्या गोटात गळतीचे सत्र सुरू झाले आहे. त्याची लागण हरियाणातील भारतीय राष्ट्रीय लोक दल (आयएनएलडी) या पक्षालाही झाली आहे. त्या पक्षाच्या एका खासदाराने बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

रामकुमार कश्‍यप असे भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आयएनएलडीच्या खासदाराचे नाव आहे. ते राज्यसभा सदस्य आहेत. कश्‍यप यांनी भाजपचे कार्याध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत त्या पक्षाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. संसदेचे वरिष्ठ सभागृह असणाऱ्या राज्यसभेत कश्‍यप यांच्या रूपाने आयएनएलडीचा एकच प्रतिनिधी होता. आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आयएनएलडीचे राज्यसभेत अस्तित्व उरलेले नाही.

आयएनएलडीच्या दोन आमदारांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्या पक्षाला आणखी एक राजकीय हादरा बसला. दरम्यान, केरळमधील माजी खासदार ए.पी.अब्दुल्लाकुट्टी यांनीही बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची 2009 मध्ये माकपमधून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यावेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयीची स्तुती त्यांना महागात पडली होती. त्यानंतर त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, आता पंतप्रधानपदी असणाऱ्या मोदींची पुन्हा प्रशंसा केल्याने अब्दुल्लाकुट्टी यांना कॉंग्रेसनेही अलिकडेच बाहेरचा रस्ता दाखवला.

Leave A Reply

Your email address will not be published.