लातूर- जुळे असल्याचा फायदा घेत दिराने भावजयीवर तब्बल सहा महिने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना लातूरमधील रिंगरोड परिसारत घडली आहे. याप्रकरणी लातुरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा जुळ्या भावांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील रिंगरोड परिसरातील एका तरुणाचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले. लग्न झालेल्या तरुणाला जुळा भाऊ आहे. त्या दोघांमध्ये बरेच साम्य आहे. घरात नवीन आलेल्या 20 वर्षीय नववधूला आपला नवरा आणि दीर यांच्यातील फरकच समजला नाही. दीराने जुळे असल्याचा फायदा घेत भावजयीवर अत्याचार केला. सहा महिन्यानंतर हा प्रकार विवाहितेच्या लक्षात आला आणि महिला माहेरी गेली. माहेरी गेलेल्या विवाहितेला आणण्यासाठी दीर गेला असता, विवाहितेने नांदायला येण्यास नकार दिला. याबाबत कुटुंबीयांनी विवाहितेला विचारले असता तिने घडलेला प्रकार सांगितला.
दरम्यान, हा गंभीर प्रकार आई-वडिलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पीडित मुलीला मानसिक आधार देऊन विवाहितेसह लातुरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार ऐकून पोलीसही चक्रावले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दोघा जुळ्या भावांना अटक केली आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.