पिंपरी – माजी विरोधी पक्ष नेते आणि तत्कालीन नगरसेवक स्व. दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्यालयावर सशस्त्र हल्ला केला होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडवून दिली होती. हा हल्ला करणाऱ्या आरोपींनी साने यांच्या राजकीय विरोधकाकडून वीस लाख रुपये उकळल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे.
पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी सांगितले की, शंकर जगताप यांच्या पिंपळे गुरव येथील कार्यालयावर झालेल्या रॉकेल बॉम्ब हल्याचा तपास करताना ही बाब समोर आली आहे. रॉकेल बॉम्ब हल्ला प्रकरणी सांगवी पोलिसांनी तन्मय रामचंद्र मदने (वय 19, पिंपळे गुरव), विक्रम विजय जवळकर (वय 20, रा. रेल्वे समोर, कासारवाडी), प्रद्युम्न किशोर भोसले (वय 23, पिंपळे गुरव) या तीन आरोपींना अटक केली. तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले होते. तपासा दरम्यान आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, मास्टरमाइंड प्रद्युम्न भोसले याचे वर्गमित्र असलेले सराईत गुन्हेगार सॅमसंग सुलेमान ऍमेट आणि देवेंद्र रामलाल बिडलान यांनी स्व. दत्ता साने यांच्या साने चौकातील जनसंपर्क कार्यालयावर 7 जून 2019 रोजी सशस्त्र हल्ला केला होता.
या घटनेनंतर आरोपींनी साने यांच्या राजकीय विरोधकांना या हल्ल्यामागे तुमचे नाव असल्याचे पोलिसांना सांगू आणि तुम्हाला या प्रकरणात अडकवू अशी धमकी देत वीस लाख रुपये उकळले होते. मात्र, हा राजकीय विरोधक नेमका कोण आहे? याची माहिती मात्र मिळू शकली नाही. या गुन्ह्यात ऍमेट आणि बिडलान हे दोन आरोपी निष्पन्न झाले होते. तर प्रद्युम्न भोसले याचे नाव निष्पन्न झाले नसल्याने तो मोकाट होता.
हाच फॉर्म्युला जगताप यांच्या कार्यालयावरील हल्ल्यानंतर वापररुन जगताप यांच्या राजकीय विरोधकांना धमकावून मोठी रक्कम उकळण्याचा आरोपींचा डाव होता. मात्र त्यापुर्वीच आरोपींना पोलिसांनी अटक केल्याने, त्यांना जगताप यांच्या विरोधकांना धमकाविण्याची संधीच मिळाली नाही. तर खुनाच्या प्रयत्नातील एका गुन्ह्यात सहभागी असलेल्या ऍमेट याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती यावेळी दिली.