जम्मू- रामबनमध्ये जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या भूस्खलनात एकाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत दोन महिलांसह सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रामबन जिल्ह्यातील सेरी गावात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर दुपारी अडीच वाजेच्या सुमारास भूस्खलन झाले. देशाच्या इतर भागाशी जोडणा-या या एकमेव महामार्गावर तासाभरातच दोन वेळा भूस्खलन झाले. यामुळे टेकडीवरून अजूनही अधून-मधून दगड आणि खडक पडत आहेत. यात दोन्ही बाजूला शेकडो वाहने अडखली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रामबनच्या सेरी भागात जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील एका टेकडीवरून अचानक मलबा पडू लागला. काही लोकांना याचा फटका बसला. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला.
जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. यादरम्यान एकाचा मृत्यू झाला आहे. डीएसपी मुख्यालय रामबन प्रदीप सिंह सेन यांनी सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बचावकार्य सुरू आहे. राष्ट्रीय महामार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद आहे.